नोकराणीची चोरी २४ तासांत उघड; माटुंगा पोलिसांकडून १०.२४ लाखांची मालमत्ता जप्त
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई : दादर पूर्व येथील एका घरात सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा माटुंगा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणी घरकाम करणाऱ्या मोलकरणीला अटक करण्यात आली असून तिच्याकडून सुमारे १०.२४ लाख रुपयांची चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जून २०२५ रोजी फिर्यादीच्या वडिलांनी त्यांच्या पत्नीचे सोन्याचे दागिने सुरक्षिततेसाठी फिर्यादीकडे दिले होते. हे दागिने फिर्यादीने दादर पूर्व येथील स्वतःच्या घरातील लॉकरमध्ये ठेवले. काही काळानंतर लॉकरची चावी घरात सापडेनाशी झाली. कामानिमित्त व्यस्त असल्याने फिर्यादीने सुमारे सहा महिने लॉकर उघडला नव्हता.
दरम्यान, घरात काम करणाऱ्या तीन मोलकरणींना चावीबाबत विचारणा करण्यात आली असता, कोणालाही चावी सापडली नसल्याचे त्यांनी सांगितले. अखेर ३ जानेवारी २०२६ रोजी चावी बनवणाऱ्याला बोलावून लॉकर उघडण्यात आला. त्यावेळी लॉकरमधील सुमारे १० लाख ९८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे उघड झाले. घरात मोलकरणींव्यतिरिक्त अन्य कोणी येत नसल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा नोंद होताच गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास सुरू केला. तिन्ही मोलकरणींची कसून चौकशी केल्यानंतर कविता शिंदे हिने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तिच्याकडून एकूण १०.२४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उप आयुक्त रागसुधा, सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब घटुकडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक वैभव पाटील तसेच तपासी अधिकारी विनोद पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.