भाजप आमदाराकडून पोलखोल!
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप; शिंदेंचा मंत्री खूप मोठा भूमाफीया ८० कोटीची जमीन ३ कोटीला लाटली
योगेश पांडे / वार्ताहर
मिरा भाईंदर – भाजप शिवसेना शिंदे गट केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत. मात्र स्थानिक पातळीवर मात्र या दोन्ही पक्षांमध्ये विस्तव ही जात नसल्याचं दिसून येत आहे. सध्या महापालिका निवडणुका होत आहेत. यानिमित्ताने एकमेकांवर गंभीर टिका करण्याचे थांबता थांबत नाही. आता मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे. हे आरोप नुसतेच गंभीर नाहीत तर मुख्यमंत्र्यांनाही विचार करायला भाग पाडणारे आहेत. विशेष म्हणजे हे आरोप करण्या आधी मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची भ्रष्टाचाराची यादीच वाचून दाखवली. पण त्यांचे घोटाळे आपल्या पेक्षा ही किती मोठे आहेत हे सांगताना मेहता यांनी स्वत:चा बचाव करण्याचाही प्रयत्न केला आहे.
परिवहन मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रतार सरनाईक हे स्वत: मोठे भूमाफीया आहेत. टिटवाळा इथं १०० एकर जमीन प्रकरणी त्यांच्यावर ईडीची धाड पडली होती. त्यांनी मिरा भाईंदरमध्ये ही ८० कोटीची जमीन ३ कोटीला मविआ सरकारमध्ये घेतली होती. त्याची स्टॅम्प ड्युटी ही बुडवली. असा थेट आरोप भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे. हे प्रकरण पार्थ पवार यांच्या पुणे जमीन खरेदी प्रकरणा प्रमाणेच आहे असं ही ते म्हणाले. सरनाईक यांनी सरकारची फसवणूक केली आहे. त्यामुळे भूमाफीया तुम्ही आहात आम्ही नाही असे प्रत्युत्तरच मेहता यांनी दिले आहे.
मिरा भाईंदर महापालिकेत टाऊन प्लॅनिंगचे आरक्षण होते. त्यात काही अटीशर्ती टाकल्या होत्या. हा १२ एकरचा भूखंड लोकांसाठी ठेवण्यात आला होता. पण ती जागा ही सरनाईक यांनी बळकावली आहे. त्या ठिकाणी यांनी रेस्टॉरंट चालू केलं आहे. तिथं पार्ट्या होतात. जनतेची जागा त्यांनी हडप केली आहे. असं असताना आम्ही भूमाफीया कसे असा प्रश्न त्यांनी केला आहे. त्यांच्यावर ईडीचा कलंक आहे. त्यामुळे आमच्यावर केलेले आरोप हे छोटे आहेत. या ईडीच्या कचाट्यातून सुटण्यासाठीच या सरनाईकांनी उद्धव ठाकरे यांना भाजप सोबत युती करा असे पत्र लिहीले होते. त्यांना त्यांची पापं लपवण्यासाठी युती हवी आहे. आम्ही हुशार आहोत. वेळ आल्यावर सर्व हिशोब करू असा इशाराही मेहता यांनी सरनाईक यांना दिला आहे.
त्या आधी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मिरा भाईंदरमध्ये आमचा युतीचा प्रयत्न होता. पण स्वार्थासाठी नेरेंद्र मेहता यांनी युती होवू दिली नाही. मिरा भाईंदरमध्ये भाजप नाही तर मेहता यांच्या कंपनीचा पक्ष आहे असा आरोप त्यांनी केला. शिवाय महापालिकेत याच मेहता यांनी मोठ मोठे घोटाळे केले आहेत. त्यांनी महापालिकेला ओरबाडले आहे. लुटले आहे. त्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत. त्यामुळे अशा व्यक्ती सोबत युती झाली नाही तेच बरे झाले असं ही ते म्हणाले. ज्यांनी या मेहतांवर गंभीर आरोप केले त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे असं ही ते म्हणाले.
याच मेहता हे मोठे भूमाफीया असल्याचा आरोप ही त्यांनी केला. त्यांनी ठेकेदारांनाही उमेदवारी दिली आहे. ज्यांना पाच वर्षांची शिक्षा झाली आहे असे ही भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत. बरबटलेल्या कलंकीत लोकांना सोबत घेवून नरेद्र मेहता निवडणूक लढत आहेत. त्यांनी पुन्हा मिरा भाईंदर महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा आहे. त्यांनी मला बजरंगी भाईजान संबोधलं आहे. तर याच बजरंगी भाईजानच्या शेवटीला तुम्ही आग लावली आहे. त्यामुळे तुमची लंका हा बजरंगी भाईजान जाळल्या शिवाय राहणार नाही असा इशाराही सरनाईक यांनी दिला. शिवाय निवडणुकीनंतर मेहतांची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी करणार आहे. त्याच बरोबर मुख्यमंत्र्यांकडे ही तक्रार करणार असल्याचं ते म्हणाले.