बिनविरोध’ निवडणूकीविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे पक्षाचे शिष्टमंडळ आक्रमक; ठाणे पालिका आयुक्त यांना
२४ तासांचा अल्टिमेटम
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाणे महापालिका निवडणुकीआधीच शिवसेनेचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याबाबत शिवसेना – (उबाठा) मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी याप्रश्नी उबाठा – मनसेच्या शिष्टमंडळाने ठाणे पालिका आयुक्त तथा निवडणूक प्राधिकृत अधिकारी सौरभ राव यांना निवेदन दिले. वादग्रस्त अधिकाऱ्यांवर २४ तासांत कारवाई करा, अन्यथा ठिय्या आंदोलन करू, असा इशारा मनसेचे नेते आणि ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी यावेळी दिला. मनसेने राज्यभरात बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी कोर्टात काय युक्तिवाद केला जातो आणि कोर्ट काय निकाल देतो ते पाहणं महत्त्वाचं आहे.
शिवसेनेच्या सहा उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात येथील निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील तसेच सत्वशिला शिंदे यांची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप मनसेने निवेदनातून केला आहे. याबाबत आयुक्त राव यांनी कारवाईचे आश्वासन दिले असले तरी लवकरच माहितीच्या अधिकारातून या वादग्रस्त अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
सत्ताधाऱ्यांशी संगनमत करीत पक्षपाती भूमिका घेऊन महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १८ मधील मनसेसह अन्य प्रतिस्पर्धी उमेदवारांचे निवडणुक कपटनितीने बाद करणाऱ्या वृषाली पाटील आणि प्रभाग ५ मधील सत्वशिला शिंदे या अधिकाऱ्यांच्या विरोधात मनसेने थेट आक्रमक पवित्रा घेत कारवाईची मागणी केली. जाधव यांनी याप्रश्नी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार तसेच न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. मात्र, त्यानंतरही अद्याप या अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. या निषेधार्थ, आयुक्त राव यांची भेट घेत जाधव यांनी २४ तासांचा अल्टीमेटम दिला आहे.
शिवसेना नेते (उबाठा), माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख अनिश गाढवे यांनीही आयुक्त राव यांना निवेदन देत काही उमेदवारांचे अर्ज छाननीदरम्यान अवैध ठरवले गेले. निवडणुकीतील निष्पक्षतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाकडे या अधिकाऱ्यांच्या बदलीसह त्यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करण्याची विनंती या शिष्टमंडळाने केली.