मेट्रोमोनियल साइटवर ‘लग्नाचे आमिष’; ISRO सायंटिस्ट असल्याचा बनाव करून महिलांची फसवणूक, आरोपी अटकेत

Spread the love

मेट्रोमोनियल साइटवर ‘लग्नाचे आमिष’; ISRO सायंटिस्ट असल्याचा बनाव करून महिलांची फसवणूक, आरोपी अटकेत

योगेश पांडे – वार्ताहर

नवी मुंबई : मेट्रोमोनियल वेबसाइटवर बनावट प्रोफाइल तयार करून स्वतःला Indian Space Research Organisation (ISRO) मधील शास्त्रज्ञ असल्याचे भासवत उच्चशिक्षित महिलांना लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक करणाऱ्या भामट्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच गुन्हे उघडकीस आले असून तब्बल ९६ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

रबाळे पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार आरोपीने ‘स्वप्निल वारूळे’ या खोट्या नावाने Shaadi.com या संकेतस्थळावर प्रोफाइल तयार करून फिर्यादी महिलेशी ओळख वाढवली. स्वतः ISRO मध्ये सायंटिस्ट तसेच काहींना भारत सरकारच्या PWD विभागातील अधिकारी असल्याचे सांगत त्याने विश्वास संपादन केला. लग्नाचे आश्वासन देत आरोपीने फिर्यादीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पुढे गुजरातमध्ये जमीन खरेदीसाठी पैशांची गरज असल्याचे सांगून ‘प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन’ काढण्यास भाग पाडून ती रक्कम उकळली.

तांत्रिक विश्लेषणातून आरोपीची खरी ओळख उघड झाली. आदर्श प्रशांत म्हात्रे (वय ३४, रा. अलिबाग) असे त्याचे नाव असून त्याला २० फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. त्याला मदत करणारा प्रेम किरण म्हात्रे (रा. पनवेल) यालाही अटक झाली आहे. दोघांना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तपासात आरोपीने ISRO सायंटिस्ट व PWD अधिकारी असल्याची बनावट ओळखपत्रे, आधारकार्ड तयार केल्याचे स्पष्ट झाले. पंचतारांकित हॉटेल्स, महागड्या मर्सिडीज कारसोबतचे फोटो आणि उच्चशिक्षित कुटुंबाचा बनाव करून प्रोफाइल आकर्षक बनवण्यात येत होता. आरोपी Jeevansathi.com, BharatMatrimony, मराठीशादी डॉट कॉम तसेच Tinder यांसारख्या प्लॅटफॉर्मवरून महिला इंजिनिअर, डॉक्टर, बँक अधिकारी, सरकारी सेवेत असलेल्या तसेच विधवा व उच्च उत्पन्न गटातील महिलांना लक्ष्य करत होता.

महिलांकडून उकळलेली रक्कम पंचतारांकित हॉटेल्स व गोव्यातील कॅसिनोमध्ये उधळल्याचे तपासात समोर आले आहे. गोव्यातील कॅसिनोमधून ८९ लाख ४० हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. सामाजिक बदनामीच्या भीतीने काही पीडित महिला तक्रार देत नसल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि पुणे आयुक्तालयांत आरोपीविरोधात विविध गुन्हे दाखल असून पनवेल शहर, मानपाडा, वडाळा, येरवडा आदी पोलीस ठाण्यांत फसवणूक व आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे नोंद आहेत. आरोपीने स्वप्निल वारूळे, हेमंत गायकर, रुद्रेश गोधळी, जयेश सोनावणे, जयेश नाईक, आदित्य म्हात्रे, तन्मय म्हात्रे अशी अनेक बनावट नावे वापरल्याचेही उघड झाले आहे.

नवी मुंबई पोलिसांनी महिलांना आवाहन केले आहे की, ऑनलाईन मेट्रोमोनियल साइटवर ओळख झालेल्या व्यक्तीच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवू नये. नोकरी, उत्पन्न व ओळखपत्रांची खातरजमा करावी. लग्नाचे आमिष दाखवून कर्ज काढण्यास किंवा पैसे देण्यास भाग पाडले जात असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon