स्वतःला ‘डॉन’ समजणाऱ्यांचा माज पुणे पोलिसांनी उतरला; ९ अट्टल गुंडांना केलं तडीपार

Spread the love

स्वतःला ‘डॉन’ समजणाऱ्यांचा माज पुणे पोलिसांनी उतरला; ९ अट्टल गुंडांना केलं तडीपार

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – शहरात स्वतःला ‘दादा’ समजत दहशत माजवणाऱ्या सराईत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाचवेळी नऊ गुंडांना शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. वाढती गुन्हेगारी, टोळीयुद्ध आणि नागरिकांमध्ये पसरलेली भीती कमी करण्यासाठी पोलिसांनी हे कठोर पाऊल उचलले असून या कारवाईमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे.

बिबवेवाडी, आंबेगाव, मार्केटयार्ड तसेच शहरातील इतर संवेदनशील भागात या गुन्हेगारांची दहशत होती. किरकोळ कारणावरून मारहाण, धमकी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत करणे असे गंभीर गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल आहेत. गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांमुळे नागरिकांमध्ये अनेकांनी तक्रार करण्याचे धाडसही केले नव्हते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेत तडीपारीची प्रक्रिया पूर्ण केली.

तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये जालिंदर मसा मोरे (४८), अण्णा ऊर्फ गणराज सुनिल ठाकर (२६), ओंकार लक्ष्मण सणस (२३), राजु महादेव डेंगळे (२२), आकाश गुलाबराव कांबळे (२१), कृष्णा बबन लोखंडे (२४), आर्यन बापु बेलदरे (२४), सोमगौडा गुरन्ना चौधरी (३३) आणि साहिल भिमा अष्टगे (२०) यांचा समावेश आहे.

पोलिस आयुक्तालयाच्या विशेष पथकाने या सर्व गुन्हेगारांची सखोल माहिती गोळा करून, त्यांच्याविरोधातील गुन्ह्यांचा अभ्यास केला. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत तडीपारीचा आदेश जारी करण्यात आला. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी नागरिकांना निर्भयपणे तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केले असून, शहरात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी अशाच कडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon