खोपोली मंगेश काळोखे हत्या प्रकरण : राष्ट्रवादीचे सुधाकर घारे, भरत भगत यांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले
योगेश पांडे / वार्ताहर
अलिबाग– खोपोली येथील मंगेश काळोखे हत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी सुधाकर घारे आणि भरत भगत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केले आहेत. त्यामुळे दोघांच्याही अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
मंगेश काळोखे यांच्या हत्याकांडाला मंगळवारी १२ दिवस पूर्ण झालेत. या प्रकरणात आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सुधाकर घारे आणि भरत भगत यांचा देखील आरोपी म्हणून समावेश आहे. दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्याने या प्रकरणाला राजकीय वर्तुळातही वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबर रोजी निर्घुण हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे समोर आला होत. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शहराध्यक्ष भरत भगत यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर दोघांनीही पनवेल येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. यावर मंगळवारी सुनावणी झाली.
या सुनावणीनंतर दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले. त्यामुळे दोघांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील अटक आरोपीने एका राजकीय पुढाऱ्याने सुपारी दिल्याने ही हत्या केल्याचे पोलिसांना होते. दरम्यान, या हत्याकांडामुळे खोपोली आणि परिसरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांकडून तपास अधिक वेगाने सुरू आहे. मंगेश काळोखे हत्या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.