टीप मिळताच सापळा; बनावट ग्राहकाने उघडकीस आणला लॉजमधील वेश्याव्यवसाय

Spread the love

टीप मिळताच सापळा; बनावट ग्राहकाने उघडकीस आणला लॉजमधील वेश्याव्यवसाय

नवी मुंबई : तुर्भेनाका परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा गुन्हे शाखेच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटने (AHTU) पर्दाफाश करत सात महिलांची सुटका केली असून, या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. लॉजचा चालक मात्र फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.

३ जानेवारी रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त माहितीदारामार्फत तुर्भेनाका येथील राज लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये महिलांना वेश्याव्यवसायासाठी सक्तीने वापरले जात असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. या बनावट ग्राहकाकडून लॉज मॅनेजर अजय कैलास गोस्वामी याने ३,५०० रुपये स्वीकारून व्यवहार निश्चित केला.

सांकेतिक इशारा मिळताच पोलिसांनी तात्काळ लॉजवर छापा टाकला. छाप्यात वेश्याव्यवसायासाठी ठेवलेल्या सात महिलांची सुटका करण्यात आली. तपासात उघड झाले की, लॉज चालक करुणाकर शेट्टी, मॅनेजर अजय गोस्वामी, महिला पुरवणारा किशोर पूर्णचंद्र साहू आणि दलाल अजयकुमार हिरालाल साब यांनी संगनमताने हा अवैध धंदा चालवला होता.

या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपींना ४ जानेवारी रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार लॉज चालकाचा शोध सुरू आहे.

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे आणि AHTU पथकाने केली. नवी मुंबईसारख्या विकसित शहरात अशा अवैध धंद्यांना आळा घालणे हे पोलीस दलाचे प्राधान्य असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon