प्रभाग क्र. १५१ मध्ये राष्ट्रवादीच्या वंदनाताई साबळेंना प्रचारात आघाडी
रवि निषाद / मुंबई
मुंबई : प्रभाग क्र. १५१ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या अधिकृत उमेदवार वंदनाताई गौतम साबळे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. प्रचारादरम्यान विविध भागांत नागरिकांकडून त्यांचे स्वागत होत असून, मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
प्रचारात सत्ताधारी नगरसेवकांच्या कामगिरीबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे काही ठिकाणी व्यक्त होत असून, त्याचा लाभ साबळेंना होत असल्याचे निरीक्षण आहे. तसेच, काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने निर्माण झालेला असंतोष आणि स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींचाही प्रचारावर परिणाम होत असल्याचे दिसून येते.
दिवंगत गौतम साबळे आणि वंदनाताई साबळे यांनी यापूर्वी प्रभागाचे प्रतिनिधित्व केले असताना राबवलेली विकासकामे, आपत्तीच्या काळात थेट रस्त्यावर उतरून केलेले काम तसेच कोरोना काळातील सेवाभावी कार्याची आठवण नागरिकांकडून दिली जात आहे. कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्यांना मदतीचा हात दिल्यामुळे गौतम साबळे यांची प्रतिमा आजही मतदारांच्या स्मरणात असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
वंदनाताई साबळे या प्रचारादरम्यान प्रभागातील गल्लोगल्ली, सोसायट्यांमध्ये जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. गौतम साबळे यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने अनेक ठिकाणी भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होत असल्याने ही बाब साबळेंसाठी जमेची बाजू ठरत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.