सोशल मीडियावरील छळ प्रकरणाचा पर्दाफाश : कापुरबावडी पोलिसांची कौशल्यपूर्ण कारवाई, आरोपी अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : कापुरबावडी पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण व तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक अशी कारवाई करत सोशल मीडियावर खोटी खाती तयार करून एका महिलेचा छळ करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे.
गुन्हा रजिस्टर नं. 808/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 79, 356(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(C)(E), 67 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
आरोपीने इतर व्यक्तींच्या वायफाय नेटवर्कचा गैरवापर करून सोशल मीडियावर बनावट खाती तयार केली होती. त्यामुळे आरोपीचा माग काढणे अत्यंत कठीण ठरत होते. मात्र कापुरबावडी पोलीस ठाण्याच्या पथकाने सखोल तांत्रिक विश्लेषण, डिजिटल पुरावे व चिकाटीपूर्ण तपासाच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला ठाणे येथे आणून अटक केली.
या यशस्वी कारवाईमुळे फिर्यादी महिलेचा पोलीस खात्यावरील विश्वास अधिक दृढ झाला असून, सायबर गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा पोलिसांचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.