निवडणूक काळात पनवेलच्या मध्यवर्ती भागात अवैध वेश्याव्यवसाय फोफावतोय, पोलिसांची भूमिका संशयास्पद
पोलीस महानगर नेटवर्क
पनवेल : पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शहराच्या मध्यवर्ती परिसरात अवैध वेश्याव्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे गंभीर आरोप नागरिकांकडून पुढे येत आहेत. शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर दिवसाढवळ्या संशयास्पद हालचाली सुरू असल्याने शहराच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर महिलांकडून सर्रास ग्राहक शोधले जात असून, काही लॉजिंगमध्ये त्यांना नेले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहराच्या हृदयात सुरू असलेल्या या कथित अवैध व्यवसायामुळे परिसरातील सामाजिक वातावरण ढासळत असून, महिला व मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
या बाबत यापूर्वीही पोलीस प्रशासनाकडे तक्रारी दाखल झाल्याचा दावा करण्यात येतो. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागू असतानाही ठोस कारवाई का होत नाही, असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष की हेतुपुरस्सर मौन, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, काही लॉजिंग केंद्रांमध्ये अवैध प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार पुढे येत असूनही, या ठिकाणी छापे किंवा चौकशी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या धंद्याला कुणाचे अभय आहे का, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
निवडणुकीच्या काळात शहरात शिस्त, सुरक्षा आणि पारदर्शकता अपेक्षित असताना, शहराच्या मध्यभागीच कायद्याची पायमल्ली होत असल्याचे आरोप गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासन व महापालिकेने तात्काळ स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
अन्यथा, लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीच्या काळातच कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा ठपका संबंधित यंत्रणांवर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.