कल्याणमध्ये सुनेचा खून; सासू आणि तिचा मित्र २४ तासांत जेरबंद
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वालधुनी नदीपुलाखाली आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. आर्थिक व कौटुंबिक वादातून सासूनेच सुनेचा खून केल्याचे तपासात उघड झाले असून, सासू आणि तिच्या मित्राला अटक करण्यात आली आहे.
१ जानेवारी रोजी रात्री वालधुनी पुलाखाली रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत एक महिला आढळून आली होती. रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर महिलेला तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
तपासादरम्यान मृत महिलेची ओळख रुपाली विलास गांगुर्डे (वय ३५, रा. कोळशेवाडी, कल्याण पूर्व) अशी पटली. रुपाली या १ जानेवारी रोजी रात्री घरातून बाहेर पडून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या सासू लताबाई गांगुर्डे यांनी पोलिसांत केली होती. मात्र पुढील चौकशीत धक्कादायक वास्तव समोर आले.
पोलिस तपासात असे निष्पन्न झाले की, रुपालीच्या पतीचा सप्टेंबर २०२५ मध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर मिळालेल्या आर्थिक लाभांवरून तसेच अनुकंपा तत्त्वावरील नोकरीवरून सासू-सून यांच्यात वाद सुरू होता. याच कारणावरून लताबाई गांगुर्डे (वय ६०) आणि तिचा मित्र जगदीश म्हात्रे (वय ६७) यांनी संगनमत करून १ जानेवारी रोजी रात्री रुपालीचा लोखंडी रॉडने मारहाण करून खून केला. पुरावे नष्ट करण्यासाठी घरातील रक्त पुसून मृतदेह वालधुनी पुलाखाली टाकण्यात आल्याचे तपासात उघड झाले.
या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. २०२३ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून, पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.