पनवेल महापालिका निवडणुकीपूर्वी हद्दपार गुंडांचा मुक्त संचार; पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह
पनवेल : आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या (१५ जानेवारी २०२६) पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात हद्दपार करण्यात आलेले गुंड पनवेल महापालिका हद्दीत बिनधास्त फिरत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल का, याबाबत गंभीर शंका व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ–२ अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ५९ अन्वये तसेच कलम ५६ (१)(अ)(ब) अंतर्गत अनेक सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित केली होती. त्यानुसार संबंधित आरोपींना नवी मुंबईसह रायगड, ठाणे, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या हद्दीबाहेर दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. निवडणुकीपूर्वी गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात होती.
मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हद्दपार आदेश लागू असतानाही अनेक आरोपी पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध भागांत खुलेपणाने वावरताना दिसत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, निवडणूक प्रक्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “कागदोपत्री कारवाई झाली; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीचा अभाव स्पष्टपणे जाणवतो,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष पथके तैनात करून कडक बंदोबस्त ठेवण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मात्र, हद्दपारीच्या आदेशांचे उल्लंघन होत असताना त्यावर ठोस कारवाई न झाल्यास प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. निवडणुकीपूर्वीच या आरोपींना प्रत्यक्ष क्षेत्राबाहेर हलवून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही, तर पनवेल महापालिका निवडणूक शांततेत पार पाडणे अवघड ठरेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्तालयाकडून तातडीने कठोर पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अन्यथा गुन्हेगारीचा प्रभाव निवडणुकीवर पडण्याचा धोका नाकारता येणार नाही.