मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल; महापालिका निवडणुकीच्या प्रचारापासून दूर, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारापासून दूर असल्याची तक्रार मागाठाण्यातील महायुतीच्या उमेदवारांनी केली आहे. यामुळं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे प्रकाश सुर्वे यांच्यावर नाराज असल्याची माहिती आहे. प्रकाश सुर्वे यांचा मुलगा मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक होता. राज सुर्वे याला वॉर्ड क्रमांक ५ मधून उमेदवारी देण्याचा निर्णय ऐनवेळी बदलण्यात आला. राज सुर्वे याला माघार घ्यायला सांगत पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी संजय घाडी यांना जाहीर केली. या सर्व घडामोडी घडल्यानंतर प्रकाश सुर्वे महायुतीच्या प्रचारापासून दूर असल्याचं समोर आलं आहे.
प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करण्यात आले होते. वॉर्ड क्रमांक ३, ४ आणि ५ च्या उमेदवारीवरुन शिवसेनेत मोठा असंतोष पाहायला मिळाला होता. वॉर्ड क्रमांक ३ भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांचा भाऊ प्रकाश दरेकर याच्यासाठी सोडण्यात आला. वॉर्ड क्रमांक चार मधून मंगेश पगारे निवडणूक लढवत आहेत. तर, वॉर्ड क्रमांक ५ मध्ये संजय घाडी निवडणूक लढवत आहेत.
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल झालेत की काय असा सवाल विचारला जात आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये सुरु असलेल्या महायुतीच्या प्रचारापासून प्रकाश सुर्वे दूर आहेत. राज सुर्वे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगितल्यामुळे प्रकाश सुर्वे इतर उमेदवारांसाठी नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चा आहेत. या प्रकरणी महायुतीच्या उमेदवारांनी शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची माहिती आहे.
मागाठाणे मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये होणाऱ्या महायुतीच्या प्रचारापासून प्रकाश सुर्वे दूर असल्यानं त्यांच्यावर पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे देखील प्रकाश सुर्वे यांच्यावर नाराज असल्याचं समजतंय.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना ९० जागांवर निवडणूक लढवत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मुंबईत काही ठिकाणी नेत्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याचं समोर आलं आहे. माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा आणि मुलगी निवडणुकीच्या रिंगणात आहे. आमदार मंगेश कुडाळकर यांच्या मुलाला देखील उमेदवारी जाहीर झाली आहे. आमदार दिलीप लांडे यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. तर, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नीनं निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.