दिल्लीतील २२ वर्षीय तरुणीवर मुंबईत तब्बल ७ वर्ष दोन नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचार व मानसिक छळ; भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – दिल्लीतील २२ वर्षीय तरुणीवर मुंबईत सात वर्षे अत्याचार आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात पोलीस (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक एक आणि आरोपी क्रमांक दोन असे दोन नातेवाईक असून दोघेही पोलीस तपास सुरू होताच फरार झाले आहेत. पीडिता दिल्लीतील नजफगढ येथे राहत असून ती २०१८ मध्ये दहावीच्या अभ्यासक्रमात शिकत असताना आरोपी क्रमांक एक शिक्षणासाठी तिला मुंबईत आणले.
आरोपी क्रमांक एक गावी असताना आरोपी क्रमांक दोनने तरुणीवर अत्याचार केले. पीडितेने ही बाब आरोपी क्रमांक एकला सांगितली; त्यानंतर आरोपी क्रमांक एकनेही धमकी देऊन तरुणीवर अत्याचार केला आणि तिच्यावर सातत्याने मानसिक दबाव आणला. अशा प्रकारे दोघांनी २०१८ ते ऑगस्ट २०२५ पर्यंत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करून तिचा मानसिक छळ केला. पीडितेने प्रथम दिल्लीतील बाबा हरिदास नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर प्रकरण भोईवाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. पोलीस तपास करत असताना दोघेही फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आणि लवकरच ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
या घटनेने समाजात संतप्त प्रतिक्रिया निर्माण केल्या आहेत. स्थानिक पोलिसांनी आरोपींवर त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले असून पीडितेला न्याय मिळावा यासाठी विशेष सुरक्षा आणि तपासाची व्यवस्था सुरू केली आहे. याप्रकरणी पोलीसांनी पीडितेचा वैद्यकीय तपास करून तिचा सविस्तर जबाब नोंदवला असून संबंधित ठिकाणांचे पंचनामे करण्यात आले आहेत. आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमे लावण्यात आली आहेत.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि संभाव्य ठिकाणांचा तपास सुरू आहे. पीडितेला समुपदेशन, कायदेशीर मदत आणि संरक्षण देण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, महिला संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनीही आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.