सराईत खंडणीखोराला एपीएमसी पोलिसांकडून अटक, सोशल मीडियावर पोस्ट टाकून करायचा ब्लॅकमेल; ८ गुन्हे, ११ एनसी नोंद
नवी मुंबई : सोशल मीडियाचा वापर करून खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला एपीएमसी पोलिसांनी अटक केली. परमेश्वर प्रकाश सिंग (३१) ऊर्फ मोनू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर ८ गुन्हे व ११ एनसी नोंद आहेत. सोशल मीडियावर ‘एनएमटी न्यूज’ या नावाने पोस्ट टाकत व्यापाऱ्यांना बदनाम करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून महिन्याचा पैसा उकळत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
एपीएमसी परिसरातील टपरी चालक व खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात पोस्ट टाकून प्रशासनाकडून कारवाई करून घेणे आणि त्यानंतर पुढे तक्रार होऊ नये म्हणून खंडणी मागणे, असा त्याचा प्रकार होता. काही गुन्ह्यांत आरोपीच्या भावाचाही सहभाग असल्याचे समोर आले असून त्याच्यावरही गुन्हे दाखल आहेत.
अलीकडेच पुरी-भाजी विक्रेत्याकडून खंडणीसाठी दबाव टाकल्यानंतर तक्रारदार पोलिसांकडे गेले. त्यानंतर सिंगने तक्रारदार व साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. स्वतःला पत्रकार असल्याचा आव आणत तो पोलिस तपासातही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत होता. तपासात सहकार्य न करणे, साक्षीदारांना धमकावणे या कारणांमुळे मंगळवारी रात्री त्याला ताब्यात घेण्यात आले.
सिंगची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून उत्तर प्रदेशातही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबईत वास्तव्य केल्यानंतर काही पोलिसांच्या आश्रयाने स्वतःला ‘पत्रकार’ म्हणून ओळख निर्माण करून त्याने खंडणीचे जाळे उभे केल्याचा आरोप आहे.
पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त पंकज डहाणे यांच्या सूचनेवरून वरिष्ठ निरीक्षक अजय शिंदे व सहायक निरीक्षक नीलेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीचा इतर गुन्ह्यांतही सहभाग असल्याची शक्यता असून एपीएमसी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.