मुंबई-गोवा हायवेवर दरोड्याचा प्रयत्न; कुडाळमध्ये थरार, सहा जणांवर गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी पहाटे कुडाळजवळ थरारक घटना घडली. कुरिअर कंटेनर लुटण्याचा प्रयत्न झाल्याने महामार्गावर काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले. यात कंटेनर चालकाच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कुडाळ पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
फिर्यादीनुसार, ३० डिसेंबर २०२५ रोजी पहाटे सुमारे १ वाजता ब्लू डार्ट सर्विसचे कुरिअर वाहन घेऊन चालक मनोज कुमार पाल (वय ३१, रा. मिर्जापूर, उत्तर प्रदेश) मुंबई-गोवा महामार्गावरून जात होते. त्यावेळी बलेनो कारमधून आलेल्या संशयितांनी कंटेनरचा पाठलाग केला. लुटीच्या उद्देशाने वाहन अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत वाहन थांबविण्यास नकार दिल्याने संशयितांनी संतापून कंटेनरवर दगडफेक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी सुजल राचिन पवार (रा. झाराप), राहुल अमित शिरसाट (रा. कुसाळ), प्रशांत नितीन सावंत व प्रञ्चल नितीन सावंत (रा. वेताळ-बांबर्डे), मदार सोनू उमरकर (रा. कुडाळ) आणि राहुल सदानंद नलावडे (रा. पावशी) यांच्याविरोधात दरोड्याचा प्रयत्न व इतर गंभीर गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास कुडाळ पोलिसांकडून सुरू आहे.