निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईत खळबळ; आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत २५ आरोपींना अटक

Spread the love

निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईत खळबळ; आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत २५ आरोपींना अटक

योगेश पांडे / वार्ताहर

नवी मुंबई – नवी मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर असतानाच गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. चोरी, हत्या, ड्रग्ज रॅकेटच्या काही घटना उघडकीस आल्याने नवी मुंबईतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.अशातच नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नवी मुंबई शहराला नशामुक्त करण्याच्या दिशेने नवी मुंबई पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहे. हेरॉईन व अफीम या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी २५ आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आलीय.

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ड्रग्ज माफियांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले होते. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी कक्षाने ही मोठी कारवाई केली आहे.अंमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार,पंजाब राज्यातील काही व्यक्ती नवी मुंबईत भाड्याच्या खोलीत,हॉटेल, लॉजमध्ये वास्तव्य करून स्थानिक तरुणांना हेरॉईन व अफीमची विक्री करत होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला आणि सहा महिन्यांच्या आत तळोजा,कळंबोली, सीबीडी बेलापूर,एनआरआय व एपीएमसी पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी २५ आरोपींना अटक केली असून १० आरोपी फरार असल्याचं समजते.

अटक करण्यात आलेले सर्व २५ आरोपी हे पंजाब राज्यातील रहिवासी आहेत. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडी आदेशानुसार तळोजा कारागृहात आहेत. या कारवाईत पोलिसांनी हेरॉईन – ६८० ग्रॅम, अफीम – १८२ ग्रॅम, कोडीन सिरपच्या १७ बाटल्या, ३० मोबाईल फोन, ४ लाख ८० हजारांची रोख रक्कम असा एकूण ३ कोटी ३१ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जप्त अंमली पदार्थ हे पंजाबहून रेल्वे व रोड ट्रान्सपोर्टमार्गे नवी मुंबईत आणले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी व पुढील तपासासाठी पोलिसांचे विशेष पथक पंजाबकडे रवाना करण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) प्रेरणा कटटे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे तसेच अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon