रस्त्यावर मोबाईलमध्ये मुलींचे फोटो दाखवून ग्राहक शोधणाऱ्या दलालास अटक; हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेट चा पर्दाफाश

Spread the love

रस्त्यावर मोबाईलमध्ये मुलींचे फोटो दाखवून ग्राहक शोधणाऱ्या दलालास अटक; हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेट चा पर्दाफाश

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – दक्षिण मुंबईतील अतिशय गर्दीच्या भागात असलेल्या डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावर उभ्या राहून एक दलाल येणाऱ्या-जाणाऱ्या पुरुषांना अडवत होता आणि त्यांना मोबाईलमध्ये मुलींचे फोटो दाखवून ग्राहक शोधत होता. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ सापळा रचला आणि संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं. चौकशीअंती एक मोठं हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार डी. बी. मार्ग पोलीस पथकाने सोमवारी दयानंद बिल्डिंग परिसरात गस्त घातली होती. याचवेळी मुकेश कुमार रामजी यादव (५०) नावाचा व्यक्ती रस्त्यावर फिरताना दिसला. तो ये-जा करणाऱ्या पुरुषांना थांबवून आपल्या मोबाईलमध्ये असलेले काही मुलींचे फोटो दाखवत होता. शिवाय व्हॉट्सअपवरूनही फोटो पाठवून ग्राहकांना आकर्षित करत होता.

पोलिसांना संशय आल्याने त्यांनी मुकेश यादवला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली. अखेर त्याने आपला गुन्हा कबूल केला. तो वेश्याव्यवसायासाठी ग्राहक शोधण्याचं काम करत होता आणि यातून मोठी दलाली कमवत होता. ग्राहकांना मुलींचे फोटो दाखवून त्यांना व्यवसायात प्रवृत्त करणं आणि संपर्क साधणं, असं त्याचं काम होतं. या दलालीतून तो भरपूर पैसे कमवत होता.

आरोपी मुकेश यादवला आता अटक करण्यात आली आहे. या सेक्स रॅकेटमध्ये त्याच्यासोबत आणखी कोणी सहभागी आहे का? तसेच तो मुली कुठून आणत होता आणि हे नेटवर्क कशा पद्धतीने चालत होतं, याचा तपास डी. बी. मार्ग पोलीस सध्या करत आहेत. या प्रकरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon