ठाण्यात सुद्धा कांग्रेसचा एकला चलो रे ची भूमिका!

Spread the love

ठाण्यात सुद्धा कांग्रेसचा एकला चलो रे ची भूमिका!

मविआत काँग्रेसला अपेक्षित जागा देण्यात आल्या नाहीत यामुळे ठाण्यात आता महाविकास आघाडी फिस्कटली

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – मुंबई नंतर ठाण्यात देखील काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट झालं. आम्ही मागितलेल्या जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने स्वीकारला नाही, काल आलेला मनसे त्यांना प्रिय झाला, अडचणीच्या काळात आम्ही जितेंद्र आव्हाडांना मदत केली, आज ते आमच्या जिवावर उठलेत अशा शब्दात ठाणे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी टीका केली. त्यामुळे ठाण्यात आता महाविकास आघाडी फिस्कटली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आणि भाजपच्या विरोधात ठाण्यामध्ये महाविकास आघाडी एकत्र येऊन लढेल असे प्रयत्न सुरू होते. मात्र ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. महाविकास आघाडीमध्ये मनसेचा समावेश झाल्यानंतर काँग्रेस आघाडीतून बाहेर पडली. ठाण्यात काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या. मात्र त्या देण्यास मनसे, ठाकरे गट, राष्ट्रवादी तयार नाही. काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला विरोध करण्यात आला होता. जागावाटपासंबंधी ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला होता.

आधी काँग्रेसकडून ३५ जागेची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या बैठकीत २३ जागांची मागणी करण्यात आली. मात्र तेवढ्या जागा सोडायला राष्ट्रवादी, मनसे आणि ठाकरेंची सेना तयार नाही. त्यामुळेच ठाण्यात काँग्रेसने आता एकला चलो रे ही भूमिका घेतली आहे.

ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण म्हणाले की, “ठाण्यात काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाड हे अडचणीत असताना आपण त्यांना मदत केली होती. आता तेच आमच्या जिवावर उठले आहेत. मनसेला एक एका प्रभागात दोन दोन जागा देण्यात आल्या आणि काँग्रेसला एकही जागा दिली नाही. आम्ही जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात निवडणूक लढणार.”काँग्रेसकडे कार्यकर्ता नाही, पैसे नाही असं मविआ बैठकीत हिणवण्यात आले, काल आलेली मनसे त्यांना प्रिय झाली. मनसे आम्हाला ठाण्यात हवी होती. मराठी मते विभाजित होऊ नये असं आम्हाला वाटतं होतं. पण आम्हाला जागा सोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढू असं विक्रांत चव्हाण म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon