विवाहित महिलेच्या पतीकडूनच तब्बल दहा वर्षांहून अधिक काळ शारीरिक आणि मानसिक छळ; आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – नेरळ पोलीस ठाणे हद्दीत कर्जत परिसरात एका विवाहित महिलेचा तब्बल दहा वर्षांहून अधिक काळ शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधांमुळे घरातील वातावरण विषारी बनले असून, या काळात पत्नीबरोबरच त्यांच्या मुलालाही मारहाण आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दीर्घकाळ अन्याय सहन केल्यानंतर अखेर या महिलेने मौन तोडत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपी पतीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी महिला आणि आरोपी पती यांचा विवाह ऑक्टोबर २०१५ मध्ये झाला होता. विवाहानंतर काहीच दिवसांत पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आल्याने घरात वाद सुरू झाले. तक्रारीनुसार, ऑक्टोबर २०१५ पासून ते १ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आरोपी पतीने वारंवार पत्नीला मारहाण केली, अपमानास्पद वर्तन केले आणि मानसिक छळ केला. पत्नीने विरोध केल्यास किंवा प्रश्न उपस्थित केल्यास त्याचा राग काढत तो अधिक आक्रमक होत असल्याचेही नमूद आहे.
या अत्याचारांचा फटका त्यांच्या मुलालाही बसल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. घरातील तणावपूर्ण वातावरणात मुलालाही मारहाण व धमक्यांना सामोरे जावे लागले. यामुळे कुटुंबातील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला होता. याशिवाय, फिर्यादी महिलेच्या माहेरच्या नातेवाइकांनाही आरोपीकडून शिवीगाळ व अपमानास्पद भाषा वापरली जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे. मदत मागितल्यास किंवा पोलिसांत जाण्याचा विचार केल्यास अधिक त्रास दिला जाईल, अशी भीती निर्माण करण्यात येत होती.
अनेक वर्षे छळ सहन करूनही कुटुंब टिकवण्याच्या आशेने फिर्यादीने तक्रार दाखल केली नव्हती. मात्र अत्याचार असह्य झाल्यानंतर आणि स्वतःसह मुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर तिने पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीच्या आधारे नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४१/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११५(२), ३५२ आणि ८५ अंतर्गत आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार कदम या करीत आहेत. आरोपीच्या विवाहबाह्य संबंधांची सत्यता, छळाचे स्वरूप, कालावधी आणि उपलब्ध पुरावे यांचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गरज भासल्यास साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय कागदपत्रांचीही पडताळणी करण्यात येणार आहे.या घटनेमुळे कर्जत-नेरळ परिसरात कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. दीर्घकाळ घरातच नरकयातना सहन करणाऱ्या महिलांनी अन्यायाविरोधात आवाज उठवावा, तसेच समाजानेही अशा प्रकरणांत संवेदनशील भूमिका घ्यावी, असे आवाहन पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.