भाजपच्या ‘नमो ठाणे’ बॅनरबाजीला उबाठा-मनसे चे बॅनरबाजीनेच चोख प्रत्त्युत्तर

Spread the love

भाजपच्या ‘नमो ठाणे’ बॅनरबाजीला उबाठा-मनसे चे बॅनरबाजीनेच चोख प्रत्त्युत्तर

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – ठाण्यात महायुतीत महापालिका निवडणुकांच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच शहरात ‘नमो भारत, नमो ठाणे’चे बॅनर लावत मित्रपक्षांसह विरोधकांना एकप्रकारे डिवचले.

प्रचारात भाजपने घेतलेली आघाडी लक्षात घेता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावत हे बॅनर शहराच्या चौकाचौकांत लागले असून त्याला समाज माध्यमांवर शिवसेना (उबाठा), शिवसेना व मनसेने जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. ‘ठाणे बाळासाहेब आणि आनंद दिघेचे’ असा उबाठाने व ‘शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना’ असा शिवसेनेने नारा दिला आहे. मनसेचे ‘मौन ठाणे’चे बॅनर पोस्ट करून शहरातील समस्या आणि गैरकारभारावर बोट ठेवले आहे.

यंदा भाजपने नमो भारत, नमो ठाणे असे बॅनर लावत प्रचारातील मुद्द्यांची दिशा स्पष्ट केली. मात्र ‘ठाण्याची ओळख पुसण्याचा हा भाजप व फुटीर गटाचा डाव आहे. भाजप आणि भाजपमय गटाला मी ठामपणे सांगतो, ठाणे फक्त बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे आहे’ अशा आशयाची पोस्ट उबाठाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी ‘एक्स’वर केली आहे. यात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा एकत्रित फोटो आहे. तसेच ‘शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना’ असे बॅनर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांवर वायरल केले असून त्यामध्ये बाळासाहेब, आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत.

आयुष्य ‘टँकरने पाणी भरतोय आणि नगरसेवकांची पोटं भरतोय’, ‘आमचं अर्ध ट्रॅफिकमध्येच संपतय’ अशा टॅगलाइनखाली ‘मौन भारत, मौन ठाणे’ अशी पोस्ट मनसे नेते व ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे. ठाणेकरांच्या मूलभूत प्रश्नांबाबत भाजप ‘मौन’ सोडून बोलावे, तसेच हे भावनिक राजकारण थांबवावे, अशी टीका मनसेच्या जाधव यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon