थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी शेतकऱ्यांची शेळी व बोकडे चोरणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना अटक; १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री झणझणीत मटणावर ताव मारण्यासाठी शेतकऱ्यांची शेळी व बोकडे चोरणाऱ्या दोन दुचाकीस्वार चोरट्यांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींकडून पाच बोकड, एक शेळी आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एक लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ‘पार्टी’च्या हव्यासापोटी चोरट्यांनी केलेल्या या गुन्ह्यांमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचे ‘पशुधन’ परत मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
गणेश कैलास ब्राम्हणे (२१) आणि सुनील अण्णाभाऊ माळी (२४) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात रांजणगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरूर तालुक्यातील बाभुळसर खुर्द, करंजावणे, गणेगाव खालसा, कर्डिलवाडी, वाघाळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेळी व बोकडे दुचाकीस्वार चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी माणिक रामभाऊ काळे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. अशाच प्रकारचे पाच गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरविली. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथील दोन तरुण दुचाकीवरून येऊन शेळी-बोकड चोरत असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून गणेश आणि सुनीलच्या मुसक्या आवळल्या.
दरम्यान, पोलिसी खाक्या दाखविताच दोघा आरोपींनी पाच ठिकाणी पशुधन चोरल्याचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींनी चोरलेले शेळी व बोकड शेतकऱ्यांना परत करण्यात आले. कष्टाने पाळलेली जनावरे सुखरुप परत मिळाल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महादेव वाघमोडे, अविनाश थोरात, दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, नितीन भोस यांच्या पथकाने ही कामगिरी केली.