मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत ! वांद्र्यात रिक्षाचालकाची मुजोरी; दोन तरुणींना शिवीगाळ, अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : सुरक्षित शहर म्हणून ओळख मिळालेल्या मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. वांद्रे स्थानक ते जिओ कन्व्हेन्शन सेंटर या मार्गावर प्रवास करणाऱ्या दोन तरुणींना रिक्षाचालकाकडून छळाचा धक्कादायक अनुभव आला. मोठ्याने बोलत असल्याचा केवळ तक्रार म्हणून चालकाने रिक्षा रस्त्याच्या मधोमध थांबवून तरुणींना उतरवण्यास भाग पाडले. एवढ्यावरच न थांबता त्याने शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी प्रसिद्ध गायक एपी ढिल्लनच्या कार्यक्रमासाठी जिओ कन्व्हेन्शन सेंटरकडे जात होत्या. प्रवासादरम्यान चालकाने त्या मोठ्याने बोलत असल्याचे कारण देत अचानक रिक्षा थांबवली. तरुणींनी कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावरच भाडे देऊ असे सांगितल्यावर चालकाचा पारा चढला आणि त्याने शिवीगाळ सुरू केली. स्वतःच्या सुरक्षेसाठी तरुणींनी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले असता चालकाने संतापून रिक्षा त्यांच्या दिशेने वेगाने चालवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही.
घटनेनंतर तरुणींनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. रिक्षाचा क्रमांक व व्हिडिओ पुरावे पोलिसांकडे जमा करण्यात आले असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, काही अंतरावर ट्रॅफिक पोलीस असताना ही घटना घडल्याने सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.