ठाण्यात युनिक मार्केन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडवर करोडोंची ठगी; ठेवीदार संतप्त, पोलीस तपास सुरू
रवि निषाद / मुंबई

ठाणे : ठाणे शहरातील गोखले रोडवरील रौनक आर्केड येथे कार्यरत युनिक (एसएमसीएस) मार्केनटाईल/मार्केन इंडिया प्रा. लि. या कंपनीवर शेकडो ठेवीदारांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे. उच्च परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक उभारून कंपनीने ठेवीदारांना पैसे न देता कार्यालय बंद केल्याची माहिती मिळत आहे.
ठेवीदारांमध्ये प्रचंड नाराजी असून अनेकांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण येथील ६५ वर्षीय मेरी टिजा फ्रांसिस यांनी कंपनीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ठाणे नौपाडा पोलिसांनी सुमारे ५१ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. याशिवाय आणखी २३ नागरिकांनी फसवणुकीच्या तक्रारी पुढे आणल्या आहेत. प्रकरणात सुरतचे राजकुमार कैलास राय, राहुल राजकुमार राय, उत्कर्ष राजकुमार राय तसेच कंपनीचे मॅनेजर घनश्याम पटेल यांची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली आहेत.
कंपनीने गुंतवणूक केल्यानंतर अधिक परतावा देण्याचे आश्वासन दिल्याचे पीडितांचे म्हणणे आहे. ठाण्यातील मॅनेजर धीरज भाटिया यांनी अनेकांना कंपनीत सामील करून मोठ्या रकमा जमा केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र प्रकरण उघड झाल्यानंतर संबंधित अधिकारी व प्रतिनिधी संपर्कात नसून फोन न उचलणे, नंबर ब्लॉक करणे अशी परिस्थिती असल्याचा ठेवीदारांचा आरोप आहे.
एका पीडिताने सांगितले की, “ही संपूर्ण फसवणूक ठाण्यातील टीम लीडर अंजली किशोर बामरगुडे यांच्या सांठगाठीत झाली. आम्ही सर्व पीडितांनी ही बाब ठाणे आणि मुंबई आर्थिक गुन्हे शाखा कार्यालयात नोंदविली आहे.”
सध्या गुन्हा दाखल असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ठेवीदारांनी तातडीने आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी वाढत आहे.