पनवेलमधील ‘ग्रीट्स रेस्टॉरंट अँड बार’वर वादाची छाया; बारमालकावर बियर बाटली फोडल्याची तक्रार, अश्लील कृत्यांचे आरोप
पनवेल : पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओएनजीसी कॉलनीजवळील ‘ग्रीट्स रेस्टॉरंट अँड बार’ (ग्रीट्स लेडीज बार) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या गोंधळाबरोबरच महिला ग्राहकांसोबत अश्लील कृत्ये होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात आल्या आहेत. बारमुळे परिसरातील वातावरण बिघडत असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.
दरम्यान, बारमालक अरुण शेट्टी यांच्याविरोधात एका ग्राहकाच्या डोक्यात बियरची बाटली फोडल्याची तक्रार पनवेल शहर पोलिसांकडे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची नोंद घेऊन पोलिस तपास करत असल्याचे सांगितले जाते. शेट्टी यांच्यावर यापूर्वीही काही गुन्हे नोंद असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळते. मात्र पोलिसांकडून याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप मिळालेली नाही.
पूर्वी शांत व कुटुंबीयांसाठी पसंतीचा मानला जाणारा हा परिसर आता रात्रीच्या बारक्लोजिंग, भांडणं आणि कथित अश्लील व्यवहारांमुळे अस्वस्थ झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. या बारवर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांकडे केली आहे. परवाना रद्द करून छापा टाकावा, अन्यथा परिस्थिती आणखी चिघळू शकते, असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.
या तक्रारींवर नवी मुंबई पोलिस काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. परिसरातील शांतता आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीची दखल आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.