खारमध्ये कोयत्याने हल्ला; पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमीचे प्राण वाचले

Spread the love

खारमध्ये कोयत्याने हल्ला; पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमीचे प्राण वाचले

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : खार येथे मालमत्ता वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे जखमी व्यक्तीचे प्राण वाचले असून आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी खार पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १२०३/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३५१(३), ४९, ३(५) तसेच शस्त्र अधिनियम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी हेमंत दलाल आणि आरोपी रोशन रमेश पाटील उर्फ सिंग यांच्यात निरा-व्हिला, खार पश्चिम येथील मालमत्तेवरून वाद सुरू होता.
२४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता हेमंत दलाल वादग्रस्त ठिकाणी पोहोचताच दोघांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला. संतापाच्या भरात आरोपीने प्रथम बांबूने मारहाण करून नंतर घरातून कोयता आणत दलाल यांच्यावर जीव घेण्याच्या उद्देशाने हल्ला केला.
दरम्यानचा आरडाओरडा ऐकून खार रेल्वे स्टेशनजवळील चौकीवर ड्युटीमध्ये असलेले पोलीस अंमलदार क्र. 113540 अनिल दत्तू जाधव तात्काळ घटनास्थळी धावले. आरोपी दलाल यांच्या डोक्यावर वार करत असताना जाधव यांनी आपल्या लाठीवर वार अडवत जखमीला बाजूला केले आणि आरोपीला हत्यारासह पकडले. पोलिसांच्या जलद प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळला.

जखमी हेमंत दलाल यांना खार-1 मोबाईल व्हॅनच्या मदतीने तत्काळ भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आधी गंभीर होती, मात्र सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कर्तव्यदक्षता आणि धाडस दाखवत वेळेत हस्तक्षेप केल्याने जखमीचे प्राण वाचवण्यात पोलीस अंमलदार अनिल जाधव यांचे विशेष योगदान राहिले. या कार्याबद्दल त्यांच्या सर्वत्र प्रशंसेचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon