वीर बाल दिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नमन

Spread the love

वीर बाल दिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नमन

गुरुद्वारा गुरु तेग बहादूर दरबार येथे कीर्तन समागमात सहभाग, शहीद साहिबजाद्यांना श्रद्धांजली

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : वीर बाल दिवसाचे औचित्य साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रावळी कॅम्प, जीटीबी नगर सायन (पूर्व) येथील गुरुद्वारा गुरु तेग बहादूर दरबार येथे आयोजित कीर्तन समागमात हजेरी लावली. गुरु ग्रंथ साहिबसमोर शीश नतमस्तक करत त्यांनी शहीद साहिबजाद्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

या कार्यक्रमाला आमदार कॅप्टन आर. तमिल सेल्वन, आमदार/एमएलसी प्रसाद लाड, मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष रवी राजा यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. कीर्तनाच्या स्वरात आणि श्रद्धेच्या वातावरणात वीर साहिबजाद्यांच्या शौर्याची आठवण संपूर्ण सभागृहात दरवळली.

फडणवीस म्हणाले, “वीर बाल दिवस हा सिख धर्मातील शहीद साहिबजादे आणि गुरु गोविंदसिंगजी यांच्या अद्वितीय बलिदानाची स्मृती जागवणारा दिवस आहे.” त्यांच्या मते गुरु परिवाराचे बलिदान भारतासह जगाच्या इतिहासातही अतुलनीय असून गुरुजींनी मानवता व धर्मरक्षणाचा संदेश अखंडपणे दिला.

मुख्यमंत्री यांनी विशेषतः साहिबजादा जोरावरसिंगजी व फतेहसिंगजी यांच्या धैर्याचा उल्लेख करत म्हटले की, “अतिशय लहान वयात अमानुष अत्याचारांचा सामना करत त्यांनी निर्भयपणे शहादत पत्करली. त्यांचा त्याग आजही न्याय आणि सत्यासाठी उभे राहण्याची प्रेरणा देतो.”

२६ डिसेंबर ‘वीर बाल दिवस’ म्हणून घोषित केल्याबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. सिख गुरु व त्यांच्या परिवाराने दाखवलेल्या आदर्शांचा स्मरण करत मानवतेच्या रक्षणाचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon