कुभेफळ शिवारात पोलिसांकडून छापा टाकून तब्बल ३१ किलो ४११ ग्रॅम गांजा जप्त; दोन महिलांसह एका इसमाला अटक

Spread the love

कुभेफळ शिवारात पोलिसांकडून छापा टाकून तब्बल ३१ किलो ४११ ग्रॅम गांजा जप्त; दोन महिलांसह एका इसमाला अटक

योगेश पांडे / वार्ताहर

छत्रपती संभाजीनगर – ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुभेफळ शिवारात पोलिसांनी छापा टाकून तब्बल ३१ किलो ४११ ग्रॅम गांजा जप्त केला असून, याप्रकरणी दोन महिलांसह एका इसमाला अटक करण्यात आली आहे.

चंद्रकला उर्फ चंदाबाई शेषराव पवार (५२), धुप्रदाबाई सुभाष मोहिते (५५), मुनिरखॉ हयातखॉ (४५) मिळालेल्या माहितीनुसार, एनडीपीएस सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, कुभेफळ शिवार येथील हॉटेल तोरणा समोरील मोकळ्या जागेत एका कापडी पालाखाली दोन महिला गांजाची विक्री करत आहेत. या माहितीची खात्री पटल्यानंतर, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएस सेल आणि करमाड पोलिसांनी संयुक्तपणे या ठिकाणी छापा टाकला.

छाप्यादरम्यान घटनास्थळी दोन महिला संशयास्पदरीत्या आढळून आल्या. त्यांच्या ताब्यातील कापडी पालाची झडती घेतली असता, तिथे एका पोत्यात २१ किलो ४९५ ग्रॅम गांजा सापडला. पोलिसांनी या महिलांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी मुनिरखॉ हयातखॉ याच्याबद्दल माहिती दिली. मुनिरखॉ हा मोटारसायकलवरून गांजा विक्रीसाठी जालना रोडच्या दिशेने गेल्याचे समजताच पोलिसांनी पाठलाग करून त्याला शेकटा परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडेही ९ किलो ९१६ ग्रॅम गांजा मिळून आला.

या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण ३१ किलो ४११ ग्रॅम गांजा किंमत ९ लाख ४२ हजार ३३०रोख रक्कम ७४ हजार ४५० आणि २५ हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण १० लाख ४१ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon