हिसकावणाऱ्या चोराचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने केला पर्दाफाश; २० सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघड, ३० लाखांचे दागिने जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – मुंबई-ठाणे परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वयोवृद्ध महिला आणि दुचाकीस्वार नागरिकांना लक्ष्य करत सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. आरोपी कोण, कुठून येतो आणि चोरीनंतर कसा पसार होतो, याचा छडा लावणे पोलिसांसाठी आव्हान ठरत होते. नागरिकांमध्ये भीती पसरवणाऱ्या या सोनसाखळी चोराचा अखेर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे.
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने या घटनांचा सखोल अभ्यास करत गोपनीय तपास सुरू केला. दहा दिवस आरोपीच्या हालचालींवर पाळत ठेवल्यानंतर कर्नाटकातील बीदर जिल्ह्यातील अब्बास युनिस सय्यद ऊर्फ ‘बड्डा’ (२१) याला अटक करण्यात आली. तो रेल्वेने मुंबई व ठाणे परिसरात येऊन गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
आरोपीकडून सुमारे ३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून ठाणे, मुंब्रा, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, चितळसर आणि वर्तकनगर या भागांतील तब्बल २० सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. बड्डा वयोवृद्ध महिला, बेसावध पुरुष तसेच दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करत असे. संधी साधून तो गळ्यातील सोनसाखळी हिसका मारून चोरायचा आणि क्षणात पसार होत असे. हीच पद्धत वापरून त्याने अनेक ठिकाणी चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपी कल्याणच्या अंबिवली परिसरात राहत होता. तसेच तो बीदरमधील इराणी वस्तीचा घरजावई असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोन्ही ठिकाणांचा तो सुरक्षित आसऱ्यासाठी वापर करत होता. चोरीसाठी तो प्रामुख्याने रेल्वेचा वापर करत असे. संशय टाळण्यासाठी अनेकदा तो बीदरच्या आधीच किंवा कल्याणमध्ये उतरण्याआधी वेगळ्याच स्थानकावर उतरून चोरी करत असे. चोरीनंतर तो पुन्हा कर्नाटकात पसार होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.