नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू; दोन मुलांनी रेल्वेखाली तर आई-वडिलांनी घरात घेतला गळफास
योगेश पांडे / वार्ताहर
नांदेड -नांदेडमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या जवळा येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. दोन मुलांची रेल्वेखाली आत्महत्या तर आई-वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. आई-वडिलांचा घातपात की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करत आहेत.
नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा लखे कुटुंबातील ही दुर्दैवी घटना आहे. या कुटुंबातील दोन मुलांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत माहिती मिळताच घरी त्यांचे आई-वडील देखील मृतावस्थेत आढळल्याने गावकरी आणि पोलीस प्रशासन चक्रावून गेले. आई-वडिलांचे मृतदेह घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत चारही जणांच्या मृत्यूच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.
मृतांमध्ये उमेश रमेश लखे – मुलगा – (२५),बजरंग रमेश लखे – मुलगा – (२२),रमेश सोनाजी लखे – वडील – (५१) आणि राधाबाई रमेश लखे – आई – (४५) समावेश आहे.
नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावातील चौघांचे मृतदेह गुरुवारी आढळले. गावातील रमेश लखे आणि राधाबाई लखे यांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले तर त्यांच्या उमेश अन रमेश या दोन मुलांचे मृतदेह मुगट इथल्या रेल्वे रुळावर आढळले. ही घटना आर्थिक विवंचनेतून घडल्याला अंदाज गावातील सरपंच प्रतिनिधीने व्यक्त केलाय. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.