ठाणे शहरात जर राष्ट्रवादी वाढवायची असेल तर त्यांनी आता विचार करावा, जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत – नजीब मुल्ला

Spread the love

ठाणे शहरात जर राष्ट्रवादी वाढवायची असेल तर त्यांनी आता विचार करावा,
जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत – नजीब मुल्ला

ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हं; नजीब मुल्लांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – एकीकडे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं असताना ठाण्यातही तशीच हालचाल सुरू झाल्याचं चित्र आहे. जितेंद्र आव्हाड हे आमचे दुश्मन नाहीत, आम्हाला जर कुणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवून आणि त्यावर विचार करू असं मोठं वक्तव्य दादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी केलं. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे कट्टर विरोधक मानले जातात. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महायुतीतून निवडणूक लढवली होती. आता त्या ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत. ३० तारखेपर्यंत जर आम्हाला कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवणार आणि विचार करणार. शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणायचे आहे असे राष्ट्रवादी ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला म्हणाले.

ठाणे शहरात जर पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी आता विचार करावा, असं सूचक वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केलं. त्यामुळे ठाण्यातील शरद पवार गट देखील आता एक पाऊल पुढे टाकून अजित पवार गटासोबत युतीचा विचार करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. बुधवारी महाविकास आघाडीची बैठक ठाण्यात पार पडली. मात्र जागा वाटप अजून जाहीर झालेले नाही.

ठाणे महापालिकेसाठी मविआ आणि मनसेच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. माजी खासदार राजन विचारे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, मनसेचे अविनाश जाधव आणि काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांच्यात बैठक झाली आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon