घाटकोपरमध्ये श्री शक्ती आयप्पा मंडळाची ४० वर्षांची अखंड पूजा परंपरा
रवि निषाद / मुंबई

मुंबई : घाटकोपर येथील नित्यानंद नगर परिसरात दरवर्षीप्रमाणे श्री शक्ती आयप्पा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेला श्री अय्यप्पा पूजा कार्यक्रम यंदाही उत्साहात संपन्न झाला. गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून ही पूजा अखंडपणे सुरू असून, परिसरातील भाविकांसाठी ती श्रद्धेचा आणि भक्तीचा केंद्रबिंदू ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या पूजा परंपरेची सुरुवात सुभय्या गुरुस्वामी यांनी केली होती. त्यानंतर जी. एस. मनी गुरुस्वामी यांनी या उपक्रमाची धुरा सांभाळत आयोजन पुढे सुरू ठेवले. तेव्हापासून ‘ॐ शरणं अय्यप्पा’ या जयघोषात दरवर्षी श्री शक्ती आयप्पा मंडळातर्फे विधिवत पूजा आयोजित केली जाते.
या पूजा कार्यक्रमात मुंबईसह परिसरातील हजारो भाविक सहभागी होतात. भाविक भक्तिभावाने भगवान अय्यप्पांचे दर्शन घेतात तसेच तीर्थ-प्रसादाचा लाभ घेतात. शिस्तबद्ध आयोजन, धार्मिक वातावरण आणि भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हा कार्यक्रम नित्यानंद नगर परिसरातील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा म्हणून ओळखला जातो.