अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी आरोपीस १० वर्षे कारावास; १ लाखांचा दंड
सुधाकर नाडार/ मुंबई
मुंबई : अंमली पदार्थ विरोधी पथक (अं.प.वि.), आझाद मैदान युनिट, गुन्हे शाखा, मुंबई यांच्या प्रभावी तपासामुळे अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या एका आरोपीस विशेष सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सक्तमजुरीचा कारावास आणि १ लाख रुपयांचा दंड अशी कडक शिक्षा सुनावली आहे.
३१ डिसेंबर २०२१ रोजी रात्री सुमारे ११.४० वाजता रे रोड येथील बीएमसी उदंचन केंद्राजवळ संत सावता मार्गावर एक इसम संशयास्पदरीत्या उभा असल्याची माहिती अं.प.वि. कक्षातील सहायक पोलीस निरीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांना मिळाली. त्या इसमाच्या हातात निळ्या व पिवळ्या पट्ट्यांची मोठी नायलॉन पिशवी होती. चौकशीदरम्यान तो उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देत असल्याने पोलिसांचा संशय बळावला.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांना पाचारण करण्यात आले. झडतीदरम्यान आरोपी बबलू पुनवासी गुप्ता (वय २९) याच्या ताब्यातून Chlorpheniramine Maleate & Codeine Phosphate Syrup (Morcerex) या अंमली पदार्थाच्या १०० मिलीच्या एकूण १३६ बाटल्या (अंदाजे किंमत ४०,८०० रुपये) आढळून आल्या. सदर मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अं.प.वि. कक्ष, गुन्हा क्रमांक ०२/२०२२, एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क) सह २२(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण करून दोषारोपपत्र ४३ वे विशेष सत्र न्यायालय, मुंबई येथे सादर करण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षीदार व पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले. त्यानुसार, २३ डिसेंबर २०२५ रोजी न्यायालयाने आरोपी बबलू पुनवासी गुप्ता यास दोषी ठरवून १० वर्षे कारावास, १ लाख रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास ६ महिन्यांची अतिरिक्त कैद अशी शिक्षा सुनावली.
या यशस्वी कारवाईत तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धराम म्हेत्रे, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पाटील, द्वितीय तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मानसिंग काळे, पोलीस पथक, कोर्ट पैरवी अधिकारी तसेच सरकारी अभियोक्ता शंकर एरंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अंमली पदार्थांविरोधातील कठोर कारवाईद्वारे बृहन्मुंबई पोलीस अंमली पदार्थमुक्त समाज निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या निकालातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.