विनयभंग व पोक्सो प्रकरणातील आरोपीस पाच वर्षांचा कारावास
रवि निषाद / मुंबई
मुंबई : चेंबूर येथील आरसीएफ पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या विनयभंग व पोक्सो प्रकरणातील आरोपीस सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि ८ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी सादर केलेल्या सक्षम व ठोस पुराव्यांच्या आधारे ही शिक्षा ठोठावण्यात आल्याची माहिती परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी दिली.
दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपीचे नाव फुलदेव रामप्रीत पासवान असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१९ मध्ये आरसीएफ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ८१/२०१९ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४, ३५४(अ), ४५२ तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप देसाई व त्यांच्या पथकाने केला होता. तपासादरम्यान आवश्यक व महत्त्वाचे पुरावे गोळा करून ते सत्र न्यायालयात सादर करण्यात आले. प्रताप देसाई सध्या गावदेवी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
सदर प्रकरणात सत्र न्यायालयाने दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी निकाल देत आरोपी फुलदेव रामप्रीत पासवान याला पाच वर्षांचा कारावास आणि ८ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपीस आणखी तीन महिन्यांचा कारावास भोगण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस उपायुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त कलीम शेख तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.