पनवेलमध्ये वैमानिक प्रशिक्षणाच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक

Spread the love

पनवेलमध्ये वैमानिक प्रशिक्षणाच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक

पोलीस महानगर नेटवर्क

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातून देशांतर्गत उड्डाणे सुरू होण्यास अवघे ४८ तास शिल्लक असतानाच वैमानिक प्रशिक्षणाच्या नावाखाली तरुण प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्या पालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. झटपट वैमानिक बनवण्याचे आमिष दाखवत परदेशात प्रशिक्षण देण्याचे खोटे आश्वासन देण्यात आल्याने खासगी वैमानिक प्रशिक्षण संस्थांकडे पाहताना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

नवी मुंबईतील खारघर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, ‘एसएफए अॅण्ड एटीपी’ या संस्थेचे संचालक पंकज अनिल कृष्णन व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैमानिक प्रशिक्षणाच्या नावाखाली चार प्रशिक्षणार्थी मुलींकडून सुमारे २ कोटी ३९ लाख रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातील एका प्रशिक्षणार्थीच्या पालकांनी, बोरीवली येथील ५८ वर्षीय सेवानिवृत्त एअर इंडिया कर्मचारी असून, आपल्या मुलीच्या प्रशिक्षणासाठी करांसह ५४ लाख रुपये या संस्थेकडे भरले होते.

सप्टेंबर २०२४ पासून खारघर येथील कार्यालयातून प्रशिक्षणाचे कामकाज सुरू करण्यात आले होते. आरोपींनी प्रशिक्षणार्थींना दुबईतील (यूएई) फूजैराह एव्हिएशन अकॅडमी येथे पाठवले; मात्र संबंधित अकॅडमीला संपूर्ण शुल्क न भरल्याने प्रशिक्षण अर्धवट थांबवण्यात आले. परिणामी, सर्व प्रशिक्षणार्थींना भारतात परतावे लागले. त्यानंतर पैसे परत मिळण्याऐवजी मानसिक छळ आणि धमक्यांना सामोरे जावे लागल्याचा आरोप पालकांनी तक्रारीत केला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील फसवणूक आणि धमकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून प्राथमिक तपास सुरू आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर वैमानिक व विमानवाहतूक क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षण संस्थांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा संस्थांच्या कामकाजावर प्रभावी नजर ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तसेच पालकांनी प्रशिक्षण संस्था निवडताना अधिकृत मान्यता, परदेशातील करार आणि आर्थिक व्यवहारांची सविस्तर माहिती तपासावी, अशी मागणी या घटनेनंतर जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon