नवीन वडवली रोडवर रेसिंगचा थरार; एक्टिवा चालकाला धडक देणारा चारचाकी चालक ४८ तासांत जेरबंद
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण (प.) : नवीन वडवली रोडवर भरधाव वेगात रेसिंग व स्टंटबाजी करताना एक्टिवा दुचाकीला पाठीमागून धडक देऊन फरार झालेल्या चारचाकी वाहनचालकाला खडकपाडा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे. या अपघातात एक्टिवा चालकाला डोके व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती.
१८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता भंडारी चौकाकडे जाणाऱ्या नवीन वडवली रोडवर हा अपघात घडला. अज्ञात चारचाकी वाहनाने एक्टिवा (एमएच ०५ सीएन ०२६३) ला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातानंतर संबंधित चालकाने कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले.
या प्रकरणी जखमी एक्टिवा चालकाचा मुलगा श्रेयश विकास कुंभार याने दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १९०, २८१, १२५ (अ)(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४ (अ)(ब), १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत खडकपाडा पोलीस ठाण्याच्या डीबी स्टाफने आरोपी मनिष सतीष मनवानी (वाहन क्रमांक एमएच ०५ जीडी ११११) याला ताब्यात घेतले. तपासात निष्पन्न झाले की, अपघाताच्या वेळी तीन चारचाकी वाहने नवीन वडवली रोडवर रेसिंग व स्टंटबाजी करत होती.
याशिवाय एमएच ०५ एएक्स ७०११ आणि एमएच ०४ एफएम ९९९ या वाहनांच्या चालकांविरोधातही भरधाव वेग व स्टंटबाजी प्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच खडकपाडा पोलीस ठाणे येथील तपास पथकाने केली.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये तसेच वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे व वेगमर्यादा पाळावी.