राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा मार्ग सदानंद दाते यांच्यासाठी मोकळा
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) विद्यमान महासंचालक सदानंद दाते यांना त्यांच्या मूळ महाराष्ट्र केडरमध्ये परत पाठविण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे एनआयए प्रमुख म्हणून दाते यांचे मुदतपूर्व प्रत्यावर्तन तात्काळ अंमलात येणार असून १ जानेवारी २०२६ पासून राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा राज्य शासनाने दिलेला वाढीव दोन वर्षांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपत आहे. नव्या महासंचालकांच्या नियुक्तीसाठी राज्य शासनाने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांची यादी पाठविली असून त्यामध्ये सेवाज्येष्ठतेनुसार सदानंद दाते हे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. एनआयएतून दाते यांना मुक्त केले जाईल का, याबाबतची संदिग्धता दूर झाल्याने त्यांच्या नियुक्तीतील अडथळा दूर झाल्याचे गृहखात्यातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
१९९० च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले दाते सध्या केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर होते. अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यकठोर आणि निर्भीड अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाला एकूण सात अधिकाऱ्यांची नावे पाठविण्यात आली असून त्यात दाते यांच्यासह महासंचालक (विधी व तांत्रिक) संजय वर्मा, गृहरक्षक दलाचे समादेशक रितेश कुमार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजीवकुमार सिंगल, महाराष्ट्र गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या महासंचालक अर्चना त्यागी, नागरी संरक्षण दलाचे महासंचालक संजीव कुमार आणि रेल्वेचे महासंचालक प्रशांत बुरडे यांचा समावेश आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून तीन नावांची शिफारस राज्य शासनाकडे पाठविली जाणार असून त्यापैकी एका नावावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाकडे आहे. त्यामुळे दाते यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. दाते डिसेंबर २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणार असले तरी नियुक्ती झाल्यास त्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळू शकतो.
दाते यांनी मुंबई पोलीस दलात गुन्हे शाखा तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या सहआयुक्तपदाची जबाबदारी पार पाडली आहे. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कार्यरत असतानाच त्यांना महासंचालकपदी बढती मिळाली आणि अल्पावधीतच ते एनआयएचे प्रमुख बनले. दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.
मीरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलीस आयुक्त, छत्तीसगढमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील अधीक्षक अशीही महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी दाते यांनी जीवाची पर्वा न करता दहशतवाद्यांना रोखण्यासाठी प्रयत्न केले होते आणि त्यात ते जखमी झाले होते. त्यानंतर दहशतवादविरोधी कारवाईसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘फोर्स वन’चे ते पहिले प्रमुख ठरले. मुंबई पोलीस दलात दहशतवादविरोधी कक्ष उभारण्याचे श्रेयही त्यांच्याकडेच जाते.