राज ठाकरेंच्या आईने दोन्ही ठाकरे बंधूंना ओवाळलं
उद्धव-राज बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर; मराठी माणसांचे पुन्हा डोळे पाणावले, संपूर्ण महाराष्ट्र भावूक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंनी अखेर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील बीएमसी निवडणूक साठी जागावाटप अंतिम झाल्यानंतर यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईतील वरळी येथील ब्लू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत युती औपचारिकरित्या जाहीर केली. शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’द्वारे याबाबत संकेत दिले होते.
बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उद्धव ठाकरे ‘मातोश्री’ निवासस्थानावरुन रवाना झाले. त्यांच्यासोबत सुपुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मीही होत्या. तिघे जण आधी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गेले. तिथून ठाकरे बंधूंसह रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी गेले. यावेळी आदेश बांदेकर, अनिल परब, किशोरी पेडणेकर आदि नेतेही उपस्थित होते. बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर दोघं वरळीला रवाना झाले.
मुंबईसोबतच नाशिक, पुणे, कल्याण-डोबिंवली, ठाणे आणि मिरा-भाईंदर महापालिकांमध्ये ठाकरे बंधू युती करणार आहेत. युतीची केवळ औपचारिक घोषणा बाकी होती. समर्थकांसह राजकीय वर्तुळाचे डोळे दोन्ही पक्षांच्या जागावाटपाकडे लागले आहे. उद्धव ठाकरेंच्या मशालीला राज ठाकरेंच्या इंजिनाची जोड लागल्याने वेग येणार का, हे पाहण्याची उत्सुकता आहे.राज ठाकरे यांनी आतापर्यंत कुठल्याही पक्षासोबत अधिकृत युती केली नव्हती. मनसेने कायमच बाहेरुन पाठिंबा दिला होता. त्यामुळे मनसेच्या जवळपास दोन दशकांच्या राजकीय इतिहासातील ही पहिलीच युती आहे. अनेक वर्षांच्या दुराव्यानं ठाकरे कुटुंब एकत्र आलं आणि दोन्ही पक्षांनीही युती जाहीर केली.
१० ते १५ जागांबाबत मनसे समाधानी नसल्याने त्यावर तोडगा काढण्याचे काम सुरु होते. आधी युती जाहीर करु, नंतर ज्या जागांबाबत आक्षेप आहे त्यांचा विचार पुढच्या दोन-चार दिवसांत करु, अशी भूमिका शिवसेना उबाठा पक्षाकडून घेण्यात आली होती, परंतु मनसे नेतृत्वाने मात्र सर्व जागांचे वाटप पूर्ण करा आणि मगच युतीची घोषणा करा असा पवित्रा घेतला असल्यामुळेच ठाकरे बंधूंची युती होण्यास काहीसा विलंब झाला.