केईएम रुग्णालयात ‘मा आयव्हीएफ’ एक्सलन्स केंद्राचे लोकार्पण; परवडणाऱ्या दरात वंध्यत्व उपचार
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. समाजाप्रती समर्पित भावनेने सेवा करणाऱ्या मालपाणी दाम्पत्याचा आदर्श नव्या पिढीने अंगीकारावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय येथे ‘मा आयव्हीएफ एक्सलन्स केंद्रा’चे लोकार्पण सोमवारी (२३ फेब्रुवारी) आबिटकर यांच्या हस्ते पार पडले. या वेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही उपस्थित राहून, मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे नमूद केले.
वंध्यत्वावरील उपचार खर्चिक मानले जात असले तरी केईएम रुग्णालयाच्या माध्यमातून ही सुविधा आता माफक दरात उपलब्ध होणार आहे, असे महापौरांनी सांगितले. आयव्हीएफ केंद्रासाठी योगदान देणाऱ्या डॉ. अंजली मालपाणी व डॉ. अनिरुद्ध मालपाणी यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. या केंद्रामुळे हजारो कुटुंबांच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बृहन्मुंबई महानगरपालिका व सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने उभारण्यात आलेले हे केंद्र सार्वजनिक–खासगी भागीदारी तत्त्वावर कार्यरत राहणार आहे. खासगी क्षेत्रातील उपचारांच्या तुलनेत सुमारे ५० टक्के सवलतीत आयव्हीएफ उपचार येथे उपलब्ध होतील. वर्षभरात ५०० ते ६०० दाम्पत्यांना सेवा देण्याची क्षमता या केंद्रात आहे.
या प्रसंगी उपमहापौर संजय घाडी, आमदार अजय चौधरी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. शैलेश मोहिते, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिष्ठाता डॉ. रावत यांनी सांगितले की, वंध्यत्व ही केवळ वैद्यकीय नव्हे तर सामाजिक व भावनिक समस्या आहे. उच्च खर्चामुळे अनेकांना उपचार परवडत नव्हते; पालकत्वाचे स्वप्न सर्वांसाठी खुले असावे, हीच या केंद्रामागील भूमिका आहे.
डॉ. अंजली मालपाणी यांनी १९८६ मध्ये केईएममध्ये निवासी डॉक्टर म्हणून काम करताना वंध्यत्वग्रस्त दाम्पत्यांची वेदना पाहून, सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला होता. चार दशकांपूर्वीचे ते स्वप्न आज साकार झाल्याचे त्यांनी सांगितले. जगभरातील दाम्पत्यांना सेवा देताना १७ हजार बालकांच्या जन्मात योगदान दिल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.
अत्याधुनिक प्रयोगशाळा, शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता विभाग, बाह्यरुग्ण सेवा, सोनोग्राफी आदी सुविधांनी सुसज्ज असलेले हे केंद्र मध्यम व अल्प उत्पन्न गटातील दाम्पत्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. वैद्यकीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसाठीही हे केंद्र मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.