कळव्यात ‘प्रशांत कॉर्नर’मुळे वाहतूक कोंडी; पदपथावरील अनधिकृत शटरवर कारवाईची मागणी

Spread the love

कळव्यात ‘प्रशांत कॉर्नर’मुळे वाहतूक कोंडी; पदपथावरील अनधिकृत शटरवर कारवाईची मागणी

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : कळवा परिसरात खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रशांत कॉर्नर या दुकानासमोर खवय्यांची मोठी गर्दी होत असल्याने परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. ग्राहकांकडून भर रस्त्यात वाहने उभी केली जात असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रशांत कॉर्नरच्या मालकाने नागरिकांसाठी असलेल्या पदपथावर अनधिकृतपणे रोलिंग शटर उभारून व्यवसाय सुरू ठेवला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांचा मार्ग अडवला जात असून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. या प्रकारामुळे अनेकदा नागरिक व दुकानदारांमध्ये वादविवादाचे प्रसंगही उद्भवत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, दुकानासमोर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक मंदावते, तर काही वेळा पूर्णपणे ठप्प होते. कार्यालयीन वेळेत तसेच सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत कोंडी अधिक तीव्र होत असल्याने परिसरातील रहिवाशांचा संताप वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पदपथावर उभारण्यात आलेले अनधिकृत शटर तातडीने जमीनदोस्त करण्याची आणि दुकानासमोरील बेकायदा पार्किंगवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

या प्रकरणी ठाणे वाहतूक विभाग नेमकी कोणती कारवाई करणार, याकडे कळवा-ठाणे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. नागरिकांचा दैनंदिन त्रास लक्षात घेता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon