अनिल गोटेंचे ‘लेटर बॉम्ब’; धुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले
पोलीस महानगर नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील चार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर १५ जानेवारीला होणाऱ्या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधील शब्दयुद्धाला धार चढत असतानाच शिवसेना (उबाठा)चे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अनिल गोटे यांच्या एका पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कुणीतरी आपल्या कुटुंबाबाबत बोलल्याची माहिती कानावर येताच गोटे यांनी अवघ्या दहा-बारा ओळींच्या पत्रातून विरोधकांना इशारा दिला. हे पत्र दिवसभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. पत्रात ‘यापुढे माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर बोलाल, तर तुमच्या नेत्यांचे असे व्हिडिओ जाहीर केले जातील की आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागेल,’ असा इशारा देण्यात आला आहे.
पत्राच्या शीर्षस्थानी ‘सावधान’ असा उल्लेख करत गोटे यांनी अत्यंत आक्रमक भाषेत विरोधकांचा समाचार घेतला आहे. ‘तुमचे कितीही खुनी, गुंड, बदमाश, बलात्कारी असू द्या; आम्ही मृत्यूचे हसत-हसत स्वागत करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे वारस आहोत,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच ‘नेत्यांचे व्हिडिओ आणि छायाचित्रांचा साठा आहे; रोज एक जरी टाकला तरी चार वर्षे पुरतील,’ असा दावाही त्यांनी केला आहे.
या पत्रामुळे गोटे यांच्या विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत असून, विविध पातळ्यांवर चर्चा रंगल्या आहेत. मात्र निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने हा विषय अधिक न वाढवण्याकडेच अनेकांचा कल असल्याचे चित्र आहे.
अनिल गोटे यांची राजकीय शैली सुरुवातीपासूनच आक्रमक, बेधडक आणि संघर्षात्मक राहिली आहे. थेट आरोप, वैयक्तिक पातळीवर विरोधकांना आव्हान आणि राजकीय शिष्टाचाराच्या चौकटी न मानणारी भाषा ही त्यांच्या वक्तव्यांची ओळख मानली जाते. समर्थकांच्या मते ही शैली निर्भीड व लढाऊ आहे, तर विरोधकांच्या मते ती वादग्रस्त आणि मर्यादा ओलांडणारी आहे. मात्र त्यांच्या या भूमिकेमुळे ते नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले असून, धुळे जिल्ह्यातील राजकारणाला वेगळी धार देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर गोटे यांच्या विरोधकांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या वक्तव्यामुळे आगामी काळात राजकीय कटुता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सोशल मीडियावरून सुरू झालेला हा वाद पुढे कोणते वळण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.