पदोन्नतीसाठी २५ हजारांची लाच; परभणीतील होमगार्ड कार्यालयातील तिघे एसीबीच्या जाळ्यात

Spread the love

पदोन्नतीसाठी २५ हजारांची लाच; परभणीतील होमगार्ड कार्यालयातील तिघे एसीबीच्या जाळ्यात

पोलीस महानगर नेटवर्क

परभणी : लाच लुचपत प्रतिबंधक विभागने परभणी येथील जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयात धडक कारवाई करत पदोन्नतीच्या बदल्यात २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. सोमवारी (दि. २३) जिंतूर रोडवरील एका हॉटेलमध्ये सापळा रचून १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वरिष्ठ पलटण नायकाला रंगेहात पकडण्यात आले.

तक्रारदाराला ३१ डिसेंबर २०२५ रोजी पलटण नायक पदाची पदोन्नती देण्यात आली होती. या पदोन्नतीच्या बदल्यात ‘बक्षीस’ म्हणून २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार २० फेब्रुवारी रोजी एसीबीकडे दाखल झाली होती. केंद्रनायक (गट क) नानासाहेब गणपतराव मोखडे, प्रशासकीय अधिकारी (गट क) माणिक शंकरराव वाडेकर आणि वरिष्ठ पलटण नायक (गट क) ज्ञानोबा बाबुराव लटपटे यांनी संगनमताने ही मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यापैकी ८ हजार रुपये फोन-पेद्वारे स्वीकारल्याचेही पडताळणीत स्पष्ट झाले.

२० फेब्रुवारी रोजी जिंतूर रोडवरील जगदंबा हॉटेल येथे तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी २५ हजार रुपयांची मागणी व त्यातील ८ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य झाले. उर्वरित रकमेसाठी तडजोड करून १२ हजार रुपये देण्याचे ठरले आणि ती रक्कम वरिष्ठ पलटण नायक लटपटे यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले.

त्यानुसार २३ फेब्रुवारी रोजी जिंतूर रोडवरील हॉटेल रायबा येथे सापळा रचण्यात आला. शासकीय पंचांसमक्ष १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ज्ञानोबा लटपटे यांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

अंगझडतीदरम्यान नानासाहेब मोखडे यांच्याकडून विवो कंपनीचा मोबाईल व २०० रुपये रोख, माणिक वाडेकर यांच्याकडून रेडमी कंपनीचा मोबाईल व ४,५५५ रुपये रोख, तर ज्ञानोबा लटपटे यांच्याकडून विवो कंपनीचा मोबाईल व १०० रुपये रोख जप्त करण्यात आले. मोबाईल हँडसेटची तपासणी व आरोपींच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात येणार आहे.

ही कारवाई एसीबीचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांनी पर्यवेक्षण केले असून पुढील तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon