मॅट्रिमोनियल साईटवरून ओळख; विश्वास संपादन करून लैंगिक व आर्थिक फसवणूक
रायगडमधील महिलेची पनवेलमध्ये धक्कादायक फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
रायगड : लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळाचा गैरवापर करून स्वतःला घटस्फोटित असल्याचे भासवत एका महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार तसेच आर्थिक व भावनिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पनवेल येथे राहणारा रोहन चिंतामण शिंदे (वय ३८) याच्याविरोधात खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी हे प्रकरण पनवेल शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एका मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर स्वतःची बनावट प्रोफाइल तयार करून आपण घटस्फोटित असल्याचे भासवले. त्याच माध्यमातून त्याने अलिबाग परिसरातील एका महिलेचा संपर्क साधला. सुरुवातीला गोड बोलणे, सहानुभूती दाखवणे व लग्नाचे आश्वासन देत त्याने तिचा विश्वास संपादन केला. ओळख वाढल्यानंतर गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत आरोपीने पीडित महिलेला पनवेलमधील दोन लॉजमध्ये नेले, तसेच तिच्या घरी जाऊन लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, या कालावधीत आरोपीने महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. महिलेच्या मोबाईलमध्ये तिच्या परवानगीशिवाय लोन अॅप डाउनलोड करून तिच्या नावावर कर्ज घेतल्याने तिला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. याशिवाय, एका चित्रपटगृहात चित्रपट पाहत असताना आरोपीने तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून घेतल्याचाही आरोप आहे.
सततच्या फसवणूक व मानसिक छळामुळे महिला प्रचंड तणावात सापडली होती. अखेर तिने खांदेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात लैंगिक अत्याचार, फसवणूक व अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपीच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, मॅट्रिमोनियल संकेतस्थळांवर ओळख करताना नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, कोणतीही वैयक्तिक अथवा आर्थिक माहिती सहजपणे शेअर करू नये, तसेच संशयास्पद वर्तन आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.