सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार! रूममध्ये झाडू मारायला नकार दिल्याने ११ वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण
योगेश पांडे / वार्ताहर
सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील एका महाविद्यालयात धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ११ वीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला चार विद्यार्थ्यांनी खोलीत घुसून बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महाविद्यालय प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव प्रसिक बनसोडे असे असून, सध्या त्याच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडित विद्यार्थी प्रसिक बनसोडे याने दिलेल्या माहितीनुसार, चार विद्यार्थ्यांनी रूममध्ये जबरदस्तीने प्रवेश करून त्याला स्टम्पने मारहाण केली. “तब्बल तीन तास मला मारहाण करण्यात आली,” असा गंभीर आरोप पीडित विद्यार्थ्याने केला आहे.
रूम स्वच्छ करणे, झाडू मारायला लावल्यावर कामे करण्यास नकार दिल्याने मारहाण केल्याचा पीडित मुलाचा आरोप आहे. या घटनेने आणखी गंभीर वळण घेतले असून, याआधीही महाविद्यालयात असे प्रकार घडले असल्याचा दावा पीडित विद्यार्थ्याने केला आहे. इतकेच नव्हे तर, “महाविद्यालय प्रशासन दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत आहे,” असा गंभीर आरोपही त्याने केला आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालक वर्गातूनही संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर संबंधित विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच महाविद्यालय प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.