‘व्हिजिट माय पोलीस स्टेशन’ उपक्रमात महात्मा फुले चौक पोलीस ठाणे प्रथम
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक दृढ व्हावा तसेच पोलिसांविषयी असलेली अनावश्यक भीती दूर व्हावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘व्हिजिट माय पोलीस स्टेशन’ या उपक्रमात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या ३५ पोलीस ठाण्यांमध्ये २९ नोव्हेंबर २०२५ रोजी हा उपक्रम राबविण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे पोलीस आयुक्तालय, ग्लोबल केअर फाउंडेशन आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या उपक्रमांतर्गत कल्याण येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमाला सर्व वयोगटांतील नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक तसेच महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जवळपास अडीच ते तीन हजार नागरिकांनी प्रत्यक्ष पोलीस ठाण्याला भेट देत विविध विभागांची कार्यपद्धती, पोलीस तपास प्रक्रिया, कायदेविषयक माहिती तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले ‘आधारवड’ ॲप, पोलीस मित्र ॲप आणि विविध हेल्पलाईन सेवांची सविस्तर माहिती घेतली.
या संपूर्ण उपक्रमात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी नागरिकांशी प्रभावी व सकारात्मक संवाद साधत पोलीस प्रशासनाची भूमिका आणि कार्यप्रणाली स्पष्ट केली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
हा गौरव पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, ठाणे जिल्हा प्राधिकरण, ग्लोबल केअर फाउंडेशन आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम यांच्या वतीने प्रदान करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. परदेशी यांनी दिली.