मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या वकीलाच्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; महिला दलालासह वकिलाला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाणे शहरातील वर्तक नगर पोलिसांनी मॉडेलिंग आणि प्रोफेशनल फोटोशूटच्या आडून चालणाऱ्या मोठ्या देहव्यवसाय रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका महिला दलालासह मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या एका पुरुषाला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत चार तरुणींची सुटका करण्यात आली असून, ठाणे आणि मुंबई परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
पोखरण रोड क्रमांक १ भागात मॉडेलिंगच्या नावाने देहव्यवसाय साठी काही महिलांना आणले जाणार असल्याची खबर वर्तक नगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी सापळा लावला. आरोपी ग्राहकांना महिलांचे फोटो पाठवून सौदेबाजी करायचे. जेव्हा आरोपी महिलांना ग्राहकाकडे सोपवण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले, तेव्हाच पोलिसांनी धाड टाकून पुरुष आणि महिला दलालाला ताब्यात घेतले.
या प्रकरणातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, अटक केलेला पुरुष आरोपी हा मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारा वकील असल्याचे तपासात उघड झाले. कायद्याचे संरक्षण करणाऱ्या व्यक्तीच अशा गुन्हेगारीत सहभागी असल्याने पोलिसही थक्क झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, हा वकील ग्राहकांना हाय प्रोफाइल मॉडेल्सचे फोटो पाठवायचा आणि आवडलेल्या महिलेसाठी एका रात्रीचा ७५ हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतचा दर आकारायचा. हे रॅकेट फक्त ठाण्यापुरते सीमित नव्हते, तर मुंबई, गोवा आणि इतर प्रमुख शहरांतील नामांकित थ्रीस्टार ते फायस्टार हॉटेल्समध्ये महिलांचा पुरवठा करण्याचे कामही तो करायचा. या छाप्यात पोलिसांनी चार पीडित तरुणींना सुरक्षितपणे वाचवले. या महिलांना मॉडेलिंगच्या कामाचे आमिष दाखवून या दलदलीत ओढले गेले होते का, याचा सखोल तपास सुरू आहे. वर्तक नगर पोलिसांनी दोन्ही आरोपींवर संबंधित कायद्यांच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा पुढील तपास ठाणे पोलिसांकडून सुरू आहे.