नवी मुंबई पोलिसांचा नागरिकांसाठी मुद्देमाल परताव्याचा विशेष उपक्रम
नवी मुंबई : नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने मुद्देमाल परताव्याचा विशेष कार्यक्रम यशस्वीपणे राबविला. पोलीस उपायुक्त (परिमंडळ–२, बेलापूर) यांच्या संकल्पनेतून सीबीडी व पोर्ट विभागातील सात पोलीस ठाण्यांमध्ये दाखल मालमत्तेच्या गुन्ह्यांतील मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित फिर्यादी व साक्षीदारांना सुपूर्द करण्यात आला.
नेरुळ, एन.आर.आय. सागरी, सीबीडी, उलवे, न्हावा शेवा, उरण आणि मोरा सागरी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल गुन्ह्यांमधील मोबाईल फोन, सोन्याचे दागिने, चांदीची भांडी तसेच दुचाकी वाहने असा मुद्देमाल या कार्यक्रमात परत करण्यात आला. हा विशेष कार्यक्रम १५ डिसेंबर २०२५ रोजी एन.आर.आय. सागरी पोलीस ठाण्यात पार पडला.
या उपक्रमामुळे अनेक नागरिकांना चोरीला गेलेली किंवा हरवलेली मालमत्ता पुन्हा मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. कायदेशीर प्रक्रियेला गती देत पीडितांना तात्काळ दिलासा देणारा हा उपक्रम ठरल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा हा उपक्रम केवळ कायद्याच्या अंमलबजावणीपुरता मर्यादित न राहता पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद व विश्वास वाढविण्यास पोषक ठरत आहे. भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.