ठाण्यात अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा; बांधकाम व्यावसायिकासह १५-२० जणांवर गंभीर आरोप

ठाण्यात अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा; बांधकाम व्यावसायिकासह १५-२० जणांवर गंभीर आरोप

पोलीस महानगर नेटवर्क 

ठाणे : शहरातील टेंभी नाका येथील जैन मंदिराचे मॅनेजिंग ट्रस्टी यांच्या मुलगा तथा बांधकाम व्यावसायिक निर्मल सोलंकी (सोलंकी बिल्डर्स) यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित तक्रारीनुसार महिलांशी अश्लील वर्तन, मारहाण तसेच गरीब आदिवासींची जमीन बळकावल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

याच प्रकरणात शिवसेना शाखाप्रमुख राम येंकुरे यांच्यावरही घरफोडी, महिलांशी अश्लील वर्तन आणि आदिवासींची जमीन बळकावल्याचे आरोप नोंदविण्यात आले आहेत. या प्रकरणातील प्रथम माहिती अहवालात (FIR) सोलंकी आणि येंकुरे यांच्यासह सुमारे १५ ते २० जणांची नावे समाविष्ट असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

तक्रारदारांनी दिलेल्या निवेदनानुसार, संबंधितांनी दबाव टाकून आणि धमकावून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून, महिलांशी गैरवर्तन केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, वर्तक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, संबंधित आरोपांची शहानिशा करण्यात येत आहे. पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon