दहिसरमध्ये बेकायदा हुक्का पार्लरचा सुळसुळाट; पोलिस संरक्षणाच्या आरोपांनी खळबळ
मुंबई : राज्यात हुक्का पार्लरांवर कठोर निर्बंध असतानाही दहिसर पूर्व परिसरात एक हुक्का पार्लर बिनधास्तपणे सुरू असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील कोहिनूर कॉम्प्लेक्समधील महाराजा हुक्का पार्लर (महाराजा हॉटेलजवळ) नियमांना केराची टोपली दाखवत रात्री उशिरापर्यंत, तर कधी सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या पार्लरमध्ये अल्पवयीन मुले-मुली मोठ्या प्रमाणात येत असून त्यांना हुक्का पुरवण्यात येतो. विशेष म्हणजे ग्राहकांना, विशेषतः मुलींना, बनावट अथवा निकृष्ट दर्जाचे हुक्का फ्लेवर दिले जात असल्याने त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारा दावा म्हणजे, पार्लर चालकाकडून “दरमहा लाखो रुपयांचा हप्ता पोलिसांना दिला जातो, त्यामुळे कारवाई होत नाही” असे खुलेपणाने सांगितले जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हा आरोप खरा ठरल्यास पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात हुक्का पार्लरांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. हुक्क्याच्या आडून निकोटिन व अंमली पदार्थांचा वापर होत असल्याचे आरोप लक्षात घेऊन, चालकांवर कारवाईपासून ते जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार सुरू असल्याने आदेशांची अंमलबजावणी होते की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
हुक्का पार्लरांमुळे युवा पिढीचे आरोग्य व भविष्य धोक्यात येत असून, अल्पवयीनांना हुक्का पुरवणे हा थेट कायद्याचा भंग आहे. तरीही अद्याप कोणती ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांनी त्वरित छापा टाकून कठोर कारवाईची मागणी केली असून, अन्यथा हे प्रकरण थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत नेण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.