मुंबईत कोकेन–एमडीएमए–हायड्रो गांजाची मोठी जप्ती; नायजेरियन नागरिकासह चौघांना अटक

Spread the love

मुंबईत कोकेन–एमडीएमए–हायड्रो गांजाची मोठी जप्ती; नायजेरियन नागरिकासह चौघांना अटक

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : शहरात अंमली पदार्थांच्या साखळीवर मोठा घाव घालत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने ना. म. जोशी मार्ग आणि बांद्रा पश्चिम परिसरात कारवाई करून तब्बल ९.३१ कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत २२६ ग्रॅम कोकेन, ५०० एक्स्टसी (एमडीएमए) गोळ्या आणि ६ किलो ५४४ ग्रॅम हायड्रो गांजा हस्तगत करण्यात आला असून नायजेरियन नागरिकासह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वरळी युनिटच्या पथकाला ना. म. जोशी मार्गावरील रेल्वे वर्कशॉप परिसरात एका नायजेरियन नागरिकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला अटकाव करण्यात आला. एनडीपीएस कायद्यानुसार झडती घेतली असता त्याच्याकडे २२६ ग्रॅम कोकेन आढळले. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार या कोकेनची किंमत सुमारे २ कोटी २६ लाख रुपये आहे. तपासात हा आरोपी भारतात बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचेही उघड झाले.

दरम्यान, घाटकोपर युनिटच्या पथकाने बांद्रा (पश्चिम) येथील पाली व्हिलेज परिसरात १० डिसेंबर रोजी एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून ५०० एक्स्टसी (एमडीएमए) गोळ्या (२४८ ग्रॅम) जप्त केल्या. या गोळ्यांची किंमत ४९.६० लाख रुपये आहे. पुढील तपासात आणखी दोन आरोपींच्या ताब्यातून ६ किलो ५४४ ग्रॅम हायड्रो गांजा (हायब्रिड गांजा) हस्तगत करण्यात आला, ज्याची अंदाजे किंमत ६.५४ कोटी रुपये आहे.

या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ९.३१ कोटी १० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ‘अंमली पदार्थमुक्त समाज’ घडविण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई पोलीस दल सातत्याने प्रयत्नशील असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उप आयुक्त (अंमली पदार्थ विरोधी कक्ष) नवनाथ ढवळे आणि सहाय्यक आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरळी युनिटकडील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित घोगरे, तर घाटकोपर युनिटकडील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उल्हास खोलम करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon